AarogyaBreaking News

पॅटर्न विडी घरकुल, साईनगरचा, कोरोनाच्या प्रतिबंधाचा!


राज्य शासनाच्या सर्व यंत्रणा कोरोनाचा संसर्ग कमी होण्यासाठी रात्रंदिवस एक करीत आहेत….मात्र त्यांना साथ हवी नागरिकांची… गाव छोटं असो की मोठं… तिथल्या नागरिकांनी मनावर घेतलं की कोणतंही संकट दूर होते…याबाबतीत सोलापूरला लागून असलेल्या विडी घरकुल आणि मुळेगावने (साईनगर) प्रशासनातील सर्व यंत्रणेसह कोरोनाला हरविण्याचा पॅटर्न तयार केला.

अवघ्या 220 लोकसंख्येचं साईनगर (मुळेगाव) तर 60 हजार लोकसंख्येचं विडी घरकुल. दोन्हीही गावं सोलापूर शहराला लागून… रोज शहरात नागरिकांचा संपर्क….यातूनच कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती प्रशासनाला होती. पालकमंत्री दत्तात्रय भरणे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी वेळोवेळी महसूल, आरोग्य, पोलीस यंत्रणांच्या बैठका घेऊन सूचना केल्या होत्या. प्रशासनाने या दोन्ही ठिकाणी योग्य नियोजन, त्वरित उपचार आणि विलगीकरणाचा पॅटर्न राबविल्याने आठ दिवसापासून रूग्ण सापडण्याचे प्रमाण शून्यावर आले आहे.

विडी घरकुल शहराच्या जवळ असल्याने रूग्ण झपाट्याने वाढण्याची भीती प्रशासनाला होती. 28 मे 2020 रोजी पहिला रूग्ण सापडल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने यापूर्वी केलेल्या आयएलआय आणि सारी या सर्वेक्षणाचा लाभ झाला. याठिकाणी एकही शासकीय दवाखाना नसल्याने आरोग्य विभागाने ज्येष्ठ नागरिक क्लिनिक आणि फिव्हर क्लिनिक सुरू केले. लोकप्रतिनिधींच्या मदतीने नागरिकांना विश्वासात घेण्यात आले. जनजागृतीमुळे घरकुलमधील काही तरूण मदतीसाठी पुढे आले. नागरिकांच्यात जनजागृती करणे, त्यांच्या हालचाली टिपणे, जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा करणे अशी कामे 175 कोविड वॉरियर्सनी केली. रेशन दुकाने, मोबाईल एटीएम, जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा केल्याने नागरिकांचा सोलापूर शहरातला वावर कमी झाला. आरोग्य विभाग व पोलीस यंत्रणेने इथल्या नागरिकांचा कंटेन्मेट झोनचा संपर्क तोडण्यास मदत केली. शिक्षक, आरोग्य कर्मचारी, अंगणवाडीसेविका, आशा कार्यकर्ती यांच्या 100 टीमद्वारे 12 हजार घरातील कुटुंबांचे सर्वेक्षण करून कोमॉर्बिड रूग्णांना वेगळे काढून त्यांना योग्य आधार दिला. 40 पॉझिटिव्ह कोरोना रूग्णांमधील 38 रूग्ण बरे झाले (यात एका 85 वर्षीय आजींबाईंचा समावेश) तर दोन रूग्णांचा कोविडने मृत्यू झाला. (यात एका अपघाती मुलीचा समावेश तर दुसऱ्याला पोटाचा कॅन्सर असल्याने) या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून एकही रूग्ण आढळून आला नाही.

साईनगरला याउलट स्थिती…इथं केवळ 50 घरे आणि 220 लोकसंख्या. मात्र निरक्षरतेमुळे नागरिकांमध्ये अनेक गैरसमजुती, चालीरिती. या परिस्थितीलाही प्रशासनाने योग्य पद्धतीने हाताळल्याने संसर्ग रोखण्यात यश आले. चार जूनला दुसऱ्या तालुक्यातून रूग्ण सासरवाडीत आला होता. 9 जूनला दुसरा, 10 जूनला तिसरा रूग्ण आढळला. एका रूग्णाचा 12 जूनला मृत्यू झाला. त्यादिवसापासून आरोग्य विभागाने पोलिसांच्या मदतीने सर्वेक्षण केले. याठिकाणी मात्र पोलीस, महसूल यंत्रणेने नागरिकांना विश्वासात घेऊन दिलासा दिला. सामाजिक परिस्थिती विचारात घेऊन 18 जूनला पोलिसांच्या बंदोबस्तात सर्वांना एकत्र करून एकाच दिवशी 207 नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. हा प्रयोग राज्यातील पहिलाच होता. जे रूग्ण पॉझिटिव्ह आले त्यांना तत्काळ विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. निगेटिव्ह अहवाल आलेल्यांना तिथेच ठेवून त्यांना सर्व सुविधा पुरविण्यात आल्या. दोनवेळा धान्याचे कीट घरोघरी देण्यात आले. शिवाय त्यांना आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिकच्या गोळ्यांचाही पुरवठा करण्यात आला होता. सलग 10 ते 15 दिवस पोलिसांचा पहाराही होता. याचा परिणाम चांगला झाला असून 27 पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 19 रूग्ण बरे होऊन घरी आले(यात एका 93 वर्षीय आजीबाईंचा समावेश) तर एकाचा मृत्यू झाला. सात रूग्णांवर यशस्वी उपचार सुरू आहेत. ते सर्व लवकरच बरे होऊन घरी परततील, अशी आशा आहे.

या दोन्ही ठिकाणी प्रशासनाच्या सर्वच यंत्रणांनी योग्यवेळी काम केले. नागरिकांची साथ, वेळेवर तपासणी, योग्य निदान आणि त्वरित उपचार मिळाल्याने मृत्यूदर नगण्य राहिला. 18 जूननंतर साईनगर परिसरात अद्याप एकही रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला नाही.‘लोकप्रबोधन, टीमवर्कमुळे यश’

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सांगितले की, ‘लोकप्रबोधन आणि टीमवर्कने काम केल्याने साईनगर, विडी घरकुल येथील रूग्णसंख्या आटोक्यात आली. नागरिकांना विश्वासात घेऊन  विडी घरकुल इथल्या नागरिकांचा शहराशी संपर्क रोखण्यासाठी तिथेच रेशन दुकाने, एटीएमची सोय करून दिली. यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत झाली.’

‘पूर्ण परिसर आयसोलेटचा फायदा’

पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी सांगितले की, ‘इथल्या नागरिकांना आयसोलेशनमध्ये न ठेवता पोलिसांच्या मदतीने पूर्ण परिसरच आयसोलेट केला. घरातून एकाला बाहेर पडू दिले नाही, सॅनिटायझेशनसाठी पोलिसांच्या वर्क शॉपने केवळ 50 हजारांमध्ये सोय करून दिली. वॉरियर्स आणि पोलिसांनी ड्रोनच्या सहाय्याने नागरिकांवर लक्ष ठेवल्याने रूग्णसंख्या आटोक्यात आणता आली. यात नागरिकांचेही सहकार्य प्रशासनाला मिळाले.’

‘ग्रामस्थांची साथही मोलाची’

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ म्हणाले, ‘महसूल, आरोग्य खात्याच्या जोडीला पोलीस आणि ग्रामस्थांची साथ मिळाल्याने काम सोपे झाले. नागरिकांमध्येही जागृती वाढली. या भागात आयुर्वेदिक, होमियोपॅथीकच्या औषधांचे वाटप केले. हे सर्वांच्या कामाचे यश आहे.’
‘जीवनाश्यक वस्तूंचा पुरवठा’

प्रांताधिकारी ज्योती पाटील म्हणाल्या, ‘जीवनाश्यक वस्तूंच्या कीटसह रेशनकार्ड नसलेल्यांनाही रेशनचा पुरवठा केला. विडी घरकुलला चार भागात चार अधिकारी आणि कोविड वॉरियर्सच्या मदतीने नियंत्रण ठेवले.’

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!