Headlines

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजनेसाठी अर्ज करा- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

सोलापूर : जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी 2 ऑक्टोबर ते 19 ऑक्टोबर 2020 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना प्रकल्प स्वरूपात राबवायची आहे. यासाठी राज्य शासनाकडून 50 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. मात्र शेडनेटमधील चारही घटकांची एकाच ठिकाणी उभारणी करणे बंधनकारक आहे. टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा आणि इतर भाजीपाला पिकांसाठी रोपवाटिका उभारणे गरजेचे आहे. 
शेडनेटगृह 1000 चौरस मीटरमध्ये 3.25 मी. उंचीचे ग्रीड साईज 6 मीटर बाय 6 मीटर सांगाडा उभारणीचा खर्च 3 लाख 80 हजार रूपये (अनुदान- एक लाख 90 हजार रूपये), पॉली टनेल 1000 चौरस मीटरमध्ये प्रकल्प खर्च 60 हजार रूपये (अनुदान 30 हजार रूपये), एक पॉवर नॅपसॅक स्पेअरचा खर्च 7600 रूपये (अनुदान 3800 रूपये), 62 प्लास्टिक क्रेटसचा खर्च 12 हजार 400 रूपये (अनुदान 6200 रूपये) असा एकूण खर्च 4 लाख 60 हजार रूपये असून याला 2 लाख 30 हजार रूपयांचे अनुदान मिळेल.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची एक एकर जमीन आणि पाण्याची कायमची सोय हवी. महिला कृषी पदवीधारकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून महिला शेतकरी गटाला द्वितीय प्राधान्य राहणार आहे. यानंतर भाजीपाला उत्पादक अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी आणि शेतकरी गटांना प्राधान्य असणार आहे. 
इच्छुक शेतकऱ्यांनी https://mahadbtmahait.gov.in या संकेतस्थळावर किंवा तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अर्ज करण्याचे आवाहन श्री. माने यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *