Headlines

नळदुर्ग भुईकोट किल्ल्यातील ऐतिहासिक नर-मादी धबधबा कोणत्याही क्षणी सुरु होण्याची शक्यता

तुळजापूर/अक्षय वायकर  : पर्यटक व इतिहासप्रेमी नागरीक आतुरतेने वाट पाहणा-या किल्ल्यातील नरमादी धबधबा कोणत्याही क्षणी सुरु होण्याची शक्यता आहे. मात्र सध्या पर्यटकांसाठी किल्ला बंद आहे.  गेल्‍या दोन आठवडयापासून सर्वत्र जोरदार पाऊस पडत  असून नळदुर्ग येथिल कुरनुर मध्यम (बोरी  धरण) प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला आहे. धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ होवुन शनिवार पर्यंत 95 टक्के पाणी साठा झाला आहे. दरम्यान, पहिल्यांदाच सलग दुस-या वर्षी धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. 
 दि. 26 सप्‍टेंबर अखेरपर्यंत जवळपास 623 मिलीमीटर पाऊस झाल्‍याची नोंद झाली आहे. लवकरच नळदुर्ग येथील बोरी धरण भरण्‍याच्‍या मार्गावर असून हे धरण भरल्‍यास ऐतिहासिक किल्‍ल्‍यातील ”नर-मादी” हा धबधबा सुरु होण्‍याची शक्‍यता नागरिकांतून व्‍यक्‍त केली जात आहे. त्‍यामुळे इतिहासप्रेमी नागरिक व पर्यटक नर-मादी धबधबा वाहण्‍याची आतुरतेने वाट पाहत आहे. 
नळदुर्ग येथील कुरनुर (बोरी धरण) मध्‍यम प्रकल्‍पाच्‍या पाणलोट क्षेत्रात शुक्रवार रोजी दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे बोरी धरण पाण्याने भरले आहे. मात्र या धरणात जास्‍त झालेले पाणी सांडव्‍यातून सध्या वाहत नाहीत. त्यास आणखीन पावसाची गरज आहे. तरीही पाण्याचा ओघ सुरु आहे. एक ते दोन दिवसात सांडवे सुरु होऊन ते पाणी शहराच्या उत्तरेस असलेल्या बोरी नदीतून किल्ल्यात येईल. त्यानंतरच किल्‍ल्‍यातील प्रेक्षणीय स्‍थळ असलेल्‍या ”नर-मादी” हा धबधबा सुरु होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
नळदुर्गचा भुईकोट किल्ला गेल्या काही वर्षापासून सोलापूरच्या युनिटी मल्टिकॉन्स कंपनीने शासनाकडून संगोपनार्थ घेऊन किल्ल्याचे रुपडे पालटले आहे. कंपनीचे मुख्य संचालक कफील मौलवी, जयधवल करमरकर, कै. भरत जैन यांच्या अथक प्रयत्नाने किल्ल्याच्या सुशोभिकरणामुळे व पर्यटकांना सोयीसुविधा उपलब्ध करुन दिल्याने गतवर्षी देश-विदेशातील पर्यटकांनी किल्ल्याला भेटी दिल्या आहेत. मात्र संसर्गजन्य कोरोनामुळे गेल्या मार्च महिन्यापासून पर्यटकांसाठी हा किल्ला बंद करण्यात आला आहे. दरम्यान, युनिटी कंपनीस काही नियम व अटी घालुन शासनाने त्वरित हा किल्ला पर्यटकांसाठी चालू करण्याची मागणी इतिहास प्रेमी नागरीक व पर्यटकांतुन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *