Headlines

जीवनावश्यक वस्तू साठी महिला संघटनेचे जोरदार निदर्शन

                                  

रास्तभाव धान्य दुकानातून दसरा दिवाळीला 14 जीवनावश्यक वस्तू द्या.- कॉ.नसीमा शेख

सोलापूर /दत्ता चव्हाण  :-  गेली सात महिने देशभरात आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यात थैमान घातलेल्या कोरोना महामारी आणि त्यामुळे केलेले लॉकडाऊन, विलगीकरण, प्रवासावरील निर्बंध यामुळे आधीच असलेली बेरोजगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. त्यातच वाढत्या महागाईने जनतेचे कंबरडे मोडले आहे. दिवाळी, दसरा तोंडावर आला असताना फटाके, रोषणाई, फराळाचे पदार्थ तर सोडाच साधे दोन वेळेच्या अन्नाला घरातील चिल्ली-पिल्ली आणि सर्वच कुटुंब महाग झाले आहे.

त्यातल्या त्यात राज्य सरकारने सप्टेंबर २०२० पर्यंत एपीएल कार्डधारकांना केलेल्या ५ किलो धान्य वाटपामुळे थोडा हातभार लागला. दुर्दैवाने आमच्या जिल्ह्यातील कित्येक कुटुंबांना जून २०२० पर्यंतच हे धान्य मिळाले. त्याकरता पुरवठाच कमी असल्याचे कारण रेशन दुकानदारांकडून देण्यात आले. तो पुरवठा त्वरित व्हावा अशी आमची मागणी आहे. 

मात्र हे देखील पुरेसे नाही, हे आपण जाणताच. गेले अनेक दिवस आम्ही सातत्याने मागणी करीत आहोत की राज्य सरकारने धान्याव्यतिरिक्त खाद्यतेल, साखर, डाळ, मीठ, चहा, साबण या अत्यावश्यक वस्तूंचा देखील पुरवठा करावा. अनेक राज्यांत तो होतो आहे. येणारा दसरा-दिवाळी या सणांचे दिवस लक्षात घेता. या वस्तू पुरवाव्या, तसेच योजनेची व्याप्ती वाढवावी. अशी अत्यंत आग्रही मागणी आम्ही आपल्या सरकारकडे करीत आहोत. अनेक कारणांमुळे रेशन कार्ड नसलेल्यांना देखील या योजनेत सामावून घ्यावे अशी आग्रही मागणी संघटनेच्या राज्यध्यक्षा माजी नगरसेविका कॉ.नसीमा शेख यांनी केले.

अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या वतीने राज्यव्यापी रास्त भाव धान्य दुकानात पिवळी, केशरी शिधापत्रिका धारकांना दसरा दिवाळी  ईद ए मिलाद ख्रिसमस असे अनेक सणांना  सवलतीच्या दरात धान्य उपलब्ध करून द्यावी ही प्रमुख मागणी घेऊन निदर्शनाची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने सोलापूरात संघटनेच्या राज्यध्यक्षा माजी नगरसेविका कॉ.नसीमा शेख यांच्या नेतृत्वाखाली मा.जिल्हाधिकारी कार्यालय पूनम गेट येथे भव्य निदर्शने करण्यात आली.यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख यांना शिष्टमंडळाद्वारे खालील मागण्याचे निवेदन देण्यात आले.यावेळी शिष्टमंडळात नसीमा शेख, कामीनीताई आडम, नलिनीताई कलबुर्गी, सुनंदा बल्ला,शकुंतला पानिभाते लिंगव्वा सोलापूरे आदी उपस्थित होते.

निवेदनातील मागण्या खालीलप्रमाणे – 

१. सणासुदीचा काळ लक्षात घेऊन किमान दोन महिने प्रत्येक राष्ट्रीय खाद्य सुरक्षा कायद्यांतर्गत येणाऱ्या आणि एपीएल कार्डधारक कुटुंबाला किमान १ किलो साखर, १ किलो रवा, १ किलो चणाडाळ, १ किलो तूरडाळ आणि ३ लिटर खाद्यतेल, मैदा, बेसन,चहापत्ती, वनस्पती तेल,गहू, तांदूळ, या अत्यावश्यक वस्तू अनुदानित दराने रेशन दुकानांतून पुरवण्यात याव्या.

२. राज्य सरकारने पुढचे किमान सहा महिने सर्व गरजूंना प्रति व्यक्ती किमान १० किलो मोफत धान्य पुरवण्याची तरतूद करावी. त्यासाठी केंद्र सरकारकडून प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजने अंतर्गत वाढीव धान्यपुरवठा उपलब्ध करून घ्यावा.

३. भाडेकरू, स्थलांतरित कामगार, बेघर, झोपड्या/वनपट्टे नावावर झाले नसल्यामुळे रहिवासी दाखला देऊ शकत नसलेले अशा सर्व गरजू कुटुंबांना देखील आधारकार्ड किंवा तत्सम एखादा पुरावा असल्यास या योजनेचा लाभ देण्यात यावा. 

४. तसेच या सर्व गरजूंना त्वरित आणि प्राधान्यक्रमाने रेशन कार्डे पुरवण्यात यावीत.

५. एपीएल कार्डधारकांना कायमस्वरूपी राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यात समाविष्ट करून त्यांच्याकरता राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करावी.

६. लॉकडाऊन काळातील संपूर्ण वीज बिल माफ करा. 

७. डिसेंबर 2020 अखेरपर्यंत बचत गटाचे कर्जाचे हप्ते भरण्यास सवलत व त्याचे व्याज माफ करावे.

यावेळी बोलताना नगरसेविका कामिनी आडम म्हणाले की, दसरा-दिवाळी पूर्वीच या सर्व वस्तू पुरवण्याचा निर्णय त्वरित घेऊन तशी सरकारी ऑर्डर काढावी आणि प्रत्येक गरीब व गरजू कुटुंबापर्यंत या योजनेची व्याप्ती वाढावी, अशी अत्यंत आग्रहाची मागणी आम्ही आपल्याकडे करीत आहोत. सणासुदीच्या या दिवसांत किमान आपल्या राज्यातील कुटुंबे तरी अंधारात आणि अन्नाच्या प्रतीक्षेत राहू नयेत, याकरता आपण हे सकारात्मक पाउल लगेच उचलाल ही अपेक्षा आहे.

जलालबी शेख, लता तुळजापूरकर,गंगुबाई कणकी, दीपा देसाई,शबाना शेख, गुरुबाई मठपती, पुष्पा स्वामी, श्रीदेवी कपाळे, परवीन सय्यद, फातिमा पठाण,सरस्वती कामूर्ती, पद्मा दिकोंडा, दत्तूबाई श्रीराम आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *