चौरी चौरातील शहिदांना योग्य महत्व दिले गेले नाहीः पंतप्रधान

नवी दिल्ली / 4 फेब्रुवारी-इतिहासाच्या पानांमध्ये चौरी चौराच्या शहिदांना योग्य महत्व दिले गेले नाही अशी खंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  व्यक्त केली. उत्तर प्रदेशातल्या गोरखपूरमधल्या चौरी चौरा येथे ‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभाचे आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. ठळकपणे माहीत नसलेल्या शहीद आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या कथा देशासमोर आणण्याचे प्रयत्न म्हणजे त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे ते म्हणाले.  स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात देश प्रवेश करत असताना  हे  अधिक उचित ठरेल, असे त्यांनी सांगितले. 

चौरी चौराच्या शहिदांची गाथा जशी गायला पाहिजे तशी ती गायली जात नाही, हे दुःखद असल्याचे पंतप्रधान म्हणाले. चौरी चौरा हा सामान्य लोकांचा स्व-प्रेरित संघर्ष होता. या संघर्षातील क्रांतिकारकांना इतिहासाच्या पानांमध्ये ठळक महत्त्व दिले गेले नसले तरी या राष्ट्राच्या मातीमध्ये त्यांचे रक्त एकरूप झाले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी व्यक्त केले.


स्वातंत्र्यलढ्यात एकाच घटनेसाठी 19 स्वातंत्र्यसैनिकांना फाशी दिले जाण्याची घटना दुर्मिळ आहे, असे ते म्हणाले.  सुमारे 150 जणांना  फाशी होण्यापासून वाचवण्यासाठी  बाबा राघवदास आणि पंडित मदन मोहन मालवीय यांनी केलेल्या  प्रयत्नांना  पंतप्रधानांनी उजाळा दिला.



स्वातंत्र्यलढ्यातील कमी ज्ञात पैलूंचा शोध घेण्याच्या प्रयत्नांची संपूर्ण मोहीम विद्यार्थी आणि युवकांना जोडत  असल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला. युवा लेखकांना स्वातंत्र्यसैनिकांवर पुस्तके लिहिण्यासाठी शिक्षण मंत्रालयाने आमंत्रित केले असल्याचे  त्यांनी नमूद केले.   अशा प्रयत्नांमधून चौरी चौराच्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांची जीवनगाथा देशापुढे आणता येऊ शकेल, अशी आशा पंतप्रधानांनी व्यक्त केली.

‘चौरी चौरा’ शताब्दी समारंभ स्थानिक कला आणि संस्कृती तसेच आत्मानिर्भरता यांच्याशी जोडला जाणे, ही  स्वातंत्र्यसैनिकांना खरी श्रद्धांजली असल्याचे पंतप्रधान म्हणाले. या कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल पंतप्रधानांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेश सरकारचेही कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *