Headlines

चला पाळीवर बोलू थोडं..

वर्षानुवर्षे विटाळाचा विषय बनवला गेल्याने तिरस्कार वाट्याला आलेल्या मासिक पाळी या विषयावर आधुनिक म्हणावल्या जाणाऱ्या जगात आजही मनमोकळं बोलता येणं शरमेची गोष्ट आहे, चार चौघात मोठ्याने बोलण्याचा हा विषय नाही. अनेक स्त्रीयांना पण तेच वाटतं. त्यामुळं पिरियड आला असं न म्हणता प्रॉब्लेम आला अस म्हणणं कधी त्या शिकल्या कळलंच नाही. सृजनाची चाहूल घेऊन येणारा रक्ताचा लाल रंग विटाळ बनून गेला इथं. पाळीमुळे मानवी वंश पुढे जात असला तरी पाळी येणाऱ्या स्त्रीच्या स्पर्शाने माणसे बाटु लागली आणि तिच्या वाट्याला मग या दिवसांत बाहेर बसणं आलं. पाळी खरोखर स्त्रीची अडचण करून टाकली या समाजाने. मग विटाळाला सन्मान द्यायचा प्रश्नच निकालात निघाला. विटाळाच्या वाट्याला आदर नाही अस्पृश्यताच येते न मग. आजही तिचं बाहेर बसणं, तिच्यामुळे बाटणं आपल्याकडे सुरूच आहे. त्यातही या विषयावर बोलणं आपल्याकडे टॅबु असल्याने पाळीला शास्त्रीय दृष्टीने समजनू घेऊन त्यानुसार काळजी घेणे दूरच रहात.

 पोर पदरकरिन झाली, वयात आली, न्हाती झाली, असे शब्द प्रयोग ऐकले होते पण नेमका त्याचा अर्थ समजायला बराच काळ जावा लागला. कोणाला विचारलं तर कोणी सांगायचे नाहीत त्याबद्दल. मग तिच्या बद्दल अगदी चार दोन ओळीत तिला माहिती असलेली माहिती एका मैत्रिणीने मला दिली होती. ती म्हणाली मला माहीतच नव्हतं याबद्दल एकदा रानात गेल्यावर आली पाळी, रक्त पाहून घाबरले, जवळ काही असायचा प्रश्नच नव्हता. पण सोबत एक मैत्रीण होती जिला माहीत होतं थोडं फार मग घरी येऊन कपडे बदलले. तिच्या मुळे माझी थोडी पाळीला सोमोरे जायची मानसिक तयारी झाली होती. म्हणजे तिच्यासारखं एकदम ब्लँक नव्हते. आल्यावर बाकी आधी तिलाच सांगितलेलं आठवतंय. मग तिनेच बरेच विचित्र सल्ले दिले होते. तिलाही कोणीतरी सांगितले असतील. लोणचं वैगरे गोष्टी, देव, मंदिर, तुळस, यापासून दूर रहायचं, नवीन झाड किंवा बिया लाव्याच्या नाहीत. कुरडयांच्या चिकाला, पापडांना हात लागला तर त्यांचा रंग लाल होतो. साप आंधळा होतो, नंतर अजून भर पडली सॅनिटरी नॅपकीन वापरायला लागल्यावर पॅड वापरून टाकून द्यावं लागतं तसं केल्याने मूल होतं नाहीत म्हणून. अशा भीतीदायक अंधश्रद्धांचा भरपूर साठा मनात ठासून भरला पण शास्त्रीय माहिती मिळायला वर्ष जावी लागली. अजून एक पाळीच्या अस्तित्वाची चमत्कारिक कथा अनेकदा ऐकली आहे. बायका सांगायच्या आजही सांगतात. बाईला विटाळ दिलाय पण आधी हा विटाळ शंकराच्या काखेत होता.

एकदा पार्वती हसली या गोष्टीला मग काय शंकराने शाप दिला आणि हा विटाळ पार्वती पर्यायाने बाईच्या वाट्याला आला. असं काय काय ऐकण्यात आलं पण पाळी का, कशी, केव्हा येते याचे शरीरशास्त्र तेव्हा लगेच काही समजले नाही. पाळीने अजून एक झालं पण स्त्रीच्या शरीराला घेऊन मनात अजून एक भयगंड खोल घर करून बसला. स्वतःच्या शरीराची स्वतःला वाटणारी भीती गहिरी झाली अजून आणि पाळी हा विषय अजून किल्ष्ट आणि बंदीस्त होतं गेला.


पाळीला विटाळाचा विळखा घातल्याने तिला घेऊन मूलभूत गोष्टींची वानवा आहे. त्यावर जाहीर वाच्यता पण होतं नाही परिणामी स्रियांची मूलभूत गरज असताना धोरणांच्या केंद्रस्थानी हा विषय आलेलाच नाही. स्वच्छतागृह, सॅनिटरी नॅपकीन, पुरेसा आराम या अतिशय गरजेच्या गोष्टी आहेत पण या चार पाच दिवसांत त्या मिळणं सामान्य स्त्रीसाठी आजही चैन आहे. सॅनिटरी नॅपकीन वापरण्याचे प्रमाण अगदी नगण्यच आहे. बहुतांश स्रिया कापड वापरतात. त्याचा वापर अनेकदा होतं असल्याने शिवाय त्वचेशी सबंध येत असल्याने, संसर्गाचा धोका आहे म्हणून ते स्वच्छ, निर्जंतुक असणे अत्यन्त गरजेचे आहे. परंतु आपल्याकडील बुरसटलेल्या विचारांमुळे अनेक स्रिया सगळं गपचूप उरकण्यावर भर देतात. साधं हे कापड धुवून कडक उन्हात वाळू द्यायची सोय आपल्याकडे नाही म्हणजे तेवढी मानसिक तयारी न येथील स्रियांची आहे न बघणाऱ्यांची. कापड वापरण्याचं मुख्य कारण म्हणजे सॅनिटरी नॅपकीनच्या किंमती. शिवाय सॅनिटरी नॅपकीन दिवसांतून चार ते पाच वेळा बदलणे गरजेचे असल्याचे सांगितले जाते. पण हा खर्च या हिशोबाने दिवसाला ३०-४० रुपयांपर्यंत जाऊ शकतो. पाच सहा दिवस या हिशोबाने पॅड वापरणे खरोखर शक्य नाही. त्यातही एका कुटुंबात जास्त स्रिया असतात तिथं हे पॅडचं गणित कसं बसवणार दर महिन्याला. म्हणूनच सॅनिटरी नॅपकीन माफक दरात नाही तर मोफत मिळणं प्रत्येक स्रिचा मूलभूत अधिकार आहे आणि ते मिळायला हवं.


सरकारी दवाखाने, गावांगावतील आरोग्य उपकेंद्र, अंगणवाडीत, शाळा, महाविद्यालयांत ते मोफत उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने शासनाने धोरण निर्मिती करायला हवी. कारण आरोग्य हा सगळ्या स्रियांचा मूलभूत हक्क आहे, पाळीतील स्वछतेचा प्रश्न महागड्या नॅपकीनमूळे अजून जटिल बनलेला आहे. परिणामी सॅनिटरी नॅपकीन ही मूठभरांची तर मेंस्ट्रुअल कप बोटावर मोजणाऱ्यांचीच मक्तेदारी आहे. कष्टकरी, गरीब वर्गातील स्रियांना आजही गलिच्छ कापडच वापरावं लागतं. म्हणूनच किमान सॅनिटरी नॅपकीन तरी सगळ्यांना गरजेप्रमाणे मोफत मिळायला हवेत.


दुसरा महत्वाचा मुद्दा असतो पॅड, कापड बदलण्याचा पण त्यासाठी आपल्याकडे पुरेसे स्वच्छतागृह नाहीत. शाळा, महाविद्यालयांमध्ये टॉयलेट नाहीत, आहेत तिथं पुरेसे पाणी, स्वच्छता नाही, अचानक पाळी आली तर वेडिंग मशीन नाही. अशी अवस्था सरार्स सगळीकडे असते. खरेतर सगळ्याच सार्वजनिक ठिकाणी अशी व्यवस्था असायला हवी. म्हणजे तुम्ही कधी विचार केलाय का दिवसभर मजुरीसाठी बाहेर गेलेल्या स्रिया त्यांचं कापड कुठं बदलत असतील? कामाच्या निमित्त घराबाहेर गेलेली स्त्री वेळोवेळी पॅड बदलत असेल का? तिच्या कामाच्या ठिकाणी त्या सोयी असतील का? तुमची मुलगी, बहीण किंवा मैत्रीण तिच्या शाळेत, महाविद्यालयात या दिवसांना कसं सामोरी जात असेल? तिथं स्वच्छतागृह, पाणी, वेडिंग मशीन आहेत का? का या दिवसांमध्ये ती हार पत्करून शेवटी घरीच रहाते? घरी असणाऱ्या स्त्रीला देखील स्वछता राखता येते का? तेवढं मोकळं वातावरण आपल्या कुटुंबांमध्ये आहे का? अशा पाळीशी संबंधित बहुतांश प्रश्नांची उत्तरं नकारार्थी आहेत. आणि तरी आपण मूग गिळून गप्प बसलो आहोत.


एकदा सीएसटी ते कसारा लोकलप्रवास करत होते. माझ्या पुढे एक मुलगी बसलेली होती संध्याकाळी काम संपवून घरी निघालेली. ती शहाडला उतरली जेव्हा उतरण्यासाठी उभी राहिली तेव्हा मला म्हणाली मागे बघ ना जरा डाग लागलाय का? मी क्षणभर गोंधळले पण त्याही पेक्षा तिच्यासाठी किती विचित्र असेल कोणा अनोळख्या व्यक्तीला अस विचारणं पण करणार काय. साधारण दोन अडीच तासांचा प्रचंड गर्दीत तो सगळा प्रवास तिने याच चिंतेत केला असेल डाग लागलाय का आणि लागला असेल तर घरी कसं जावं? स्टेशनवर स्वछतागृह असलं तर पॅड मिळण्याची सुविधा कुठं असते. कामाच्या ठिकाणी पॅडची सोय नसेल, लोकल सुटेल म्हणून चेंज करायला वेळ मिळाला नसेल अशी काही कारणं असतील तिची. पण हे फक्त प्रातिनिधिक उदाहरण झालं. प्रत्यक्षात याहून वाईट अनुभव येतात घराबाहेर पडणाऱ्या स्रियांना. म्हणून या दिवसांमध्ये घराबाहेर पडणाऱ्या तिची आणि घरात राबणाऱ्या तिची दोघींचीही आरामाची गरज सारखीच असल्याने ती पूर्ण व्हायला हवी.


 पाळी हा विटाळ नाही तर ती एक स्त्रीशरीराची नैसर्गिक प्रक्रिया आहे. पाळी बाईला येते म्हणून पुरुषांनी बाजूला सरावं असंही काही नाही. एक नसर्गिक प्रक्रिया आहे ती समजनू घेऊन तिला तितक्याच सहजतेने सामोरे जाण्यासाठी कुटुंबाची मानसिक तयारी करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. विटाळ, अडचण म्हटली की सुरवातीलाच घरातील मुलीचं मनोधैर्य खचतं, पाळी तिला ओझं वाटू लागतं, स्वतःच्या शरीराची लाज वाटू लागते. सॅनिटरी नॅपकीन वापरणे ही चैनेची नाही तर मूलभूत गरजेची गोष्ट आहे सगळ्या स्रियांची मूलभूत गरज पूर्ण करणं शासनाची जबाबदारी आहे. म्हणून आधी मुक्त संवाद घडू देणारी कुटुंब तयार व्हायला हवीत. जाणीव निर्मिती झाल्याशिवाय धोरणनिर्मितीला वेग येत नाही. मासिक पाळीचं आपल्याकडे तेच झालंय. समाजचं तिला विटाळ संबोधून दुर्लक्ष करतो, धोरणकर्त्यांना तर समाजाची उदासीनता हवीच असते म्हणूनच पिरियड, पॅड यावर बोलायलाचं हवं. आजच्या जागतिक मासिक पाळी आरोग्य दिनाच्या निमित्ताने एवढीच अपेक्षा.



लेखिका – रोहिणी नवले , भंडारदरा ,अहमदनगर.


टीप-लेखात व्यक्त केलेल्या मताशी प्रकाशक व संपादक सहमत असतील असे नव्हे.

Leave a Reply