Breaking NewsCareer

कौतुकास्पद कामगिरी करणारी ‘आस्मा’ व अंतराळात झेप घेणारी ‘अंतरा’ या कन्यांचा सदैव अभिमान – गृहमंत्री अनिल देशमुख

मुंबई दि. ९ – सहायक विक्रीकर आयुक्त या पदावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत निवड झालेली नांदेडच्या पोलीस वाहनचालकांची कन्या आस्मा आणि अंतराळात झेप घेऊन फायटर पायलट झालेली नागपूरची कन्या अंतरा मेहता. या दोन्ही महाराष्ट्र कन्यांचा आम्हाला सदैव अभिमान आहे, अशा शब्दात या दोघींचे कौतुक राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.

नांदेड पोलीस दलामध्ये वाहनचालक या पदावर कार्यरत असलेले सय्यद जहीर अहमद यांची कन्या आस्मा हिला महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत नेत्रदिपक यश मिळवून, तिची निवड सहायक विक्रीकर आयुक्त या पदी झाली याचा खूप आनंद व अभिमान वाटला. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आस्माच्या  घरी दूरध्वनी करून त्यांचे अभिनंदन केले. तसेच तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

नागपूरची कन्या
त्याचप्रमाणे नागपूरची कन्या अंतरा मेहता हिची संरक्षण दलात फायटर पायलट म्हणून निवड झाली. त्याबद्दल तिचे कौतुक गृहमंत्र्यांनी फोन करून केले. या दोघींचीही ते लवकरच भेट घेणार आहेत.

राज्यातील सव्वा दोन लाख पोलीस आणि त्यांच्या कुटुंबीयांचा गृहमंत्री या नात्याने मी कुटुंबप्रमुख आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या चांगल्या कामगिरीचे कौतुक करणे हे माझे कर्तव्य आहे. त्यांच्या  सुख दुःखात  सहभागी होण्याचा मी प्रयत्न करत आहे. पोलीस दलातील नोकरी सांभाळत आपल्या पाल्यांना उच्च शिक्षण व उच्च ध्येयाकडे घेऊन जाणाऱ्या सर्व पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांचा मला अभिमान आहे, त्यांचे कौतुक आहे, अशा भावना गृहमंत्र्यांनी व्यक्त केल्या.

तसेच अंतरा ही आमच्या नागपूरची कन्या असल्याने तिचाही खूप अभिमान आहे. अंतरा ही आपल्या राज्यातील पहिली महिला फायटर पायलट असून ती देशात दहावी आली आहे. तिच्या वडिलांनाही मी फोन करून शुभेच्छा दिल्या आणि अंतरालाही दूरध्वनीद्वारे शुभेच्छा देऊन कौतुक केले.

आपल्या राज्यातील असे  कौतुकास्पद काम करणाऱ्या युवांचा आपल्या सर्वांना अभिमान असायला हवा, त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप  आपण द्यायला हवी. त्यामुळे निश्चितच त्यांचे मनोबल वाढेल आत्मविश्वास वाढेल असे श्री. देशमुख यांनी म्हटले आहे.

Related Articles

One Comment

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!