कम्युनिस्ट पक्षाचा गौरवशाली इतिहास-एक चिंतन

एक जागतिक तत्वज्ञ कार्यकर्ता ,कार्ल मार्क्स याने पुढील सिद्धांत मांडला…. निसर्ग विकासातून माणूस उदयास आला.जन्माला येताना काही शरीर धर्म,मनोधर्म आणि गरजा घेऊन तो जन्मास आला. त्याला हवा जाग्यावर मिळाली .पाणी शोधावं लागल़. अन्न निर्माण करावं लागलं.वस्तू निर्मिती ही त्याची गरज झाली,वस्तू निर्मितीतून अनेक तंत्रविद्येचे अविष्कार आले. मानवजातीच्या सुरुवातीच्या काळात माणसे गटागटाने राहिली होती. तेव्हा मालमत्ता सामुदायिक होती. कालांतराने खाजगी मालमत्ता ही जाणीव निर्माण झाली.तिला लोभाचं रूप प्राप्त झालं.त्यातून तंटेबखेडे निर्माण झाले. गरजेची वस्तू निर्माण करण्यासाठी थोडे श्रम पडतात पण प्रत्यक्षात श्रमिकांच्या वाट्याला अधिक श्रम येतात. या अधिक श्रमाचे फलित प्रत्यक्ष  राबणाऱ्याला मिळत नाही.त्यांना राबवणाऱ्या धनदांडग्यांना ते मिळतं.शेवटी राबणारे राबूनही गरीब राहतात ,राबवणारे मात्र श्रीमंत होतात. यातून वेगवेगळे वर्ग आणि त्यांचे हितसंबंध निर्माण होतात .मग सुरु होतो वर्गसंघर्ष .

अशा संघर्षात जर श्रमिकांना आत्मबोध घडला ,जाण आली, आपल्या श्रमातून हे विश्व आकाराला आलं.हे कळलं तर हा वर्ग फणा वर  काढील.फुत्कार टाकील आणि प्रसंगी घणाघात करून या समाजव्यवस्थेची मोडतोड करून टाकील. ऐतिहासिक घटना क्रमाने हे होणारच आहे. पण ते सत्वर घडावे यासाठी कार्ल मार्क्स ने जगातील श्रमिकांना कामगारांना आवाहन केलं की “कामगार बंधूंनो उठा, सज्ज व्हा ,लढा”अथवा जगातील कामगारांनो एक व्हा. यातूनच कम्युनिस्ट चळवळीचा उदय झाला. कालांतराने रशियात मार्क्स च्या तत्त्वज्ञानाने अन लेनिन च्या कर्त्रुत्वाने राज्यक्रांती घडवून आणली.

        भारतीय तत्त्वज्ञानाचे पुरस्कर्ते स्वामी विवेकानंद अमेरिकेत जागतिक धर्म परिषदेत गेले होते.परत येताना फ्रान्स सह अनेक युरोपियन देशांचा दौरा करून विद्वान व्यक्तींशी चर्चा करून परत भारतात आले व त्यांनी ‘मी समाजवादी आहे’ हा प्रबंध लिहिला.आपल्याला माहीतच आहे की इसवीसन 1818 मध्ये भारतात मराठ्यांचे राज्य संपुष्टात आले व इंग्रजांचे कंपनी सरकारचे राज्य सुरू झाले. ईस्ट इंडिया कंपनीने व्यापाराच्या निमित्ताने भारतात प्रवेश करुन येथील राज्यसत्ता ताब्यात घेतली आणि सुरू केला जनतेचा छळ.यातूनच इंग्रजांविरुद्ध पहिले बंड 1820 ते 1832 या कालखंडात आद्य क्रांतिकारक उमाजी नाईक यांनी पुकारले. त्यांनी इंग्रजांविरूध्द पहिला जहाल संघर्ष उभा केला. त्यामुळे इंग्रजांनी त्यांना पकडून 3 फेब्रुवारी 1832 रोजी फासावर चढवले.पुढे देशात छोटे छोटे अनेक प्रादेशिक बंडे झाली.1857 मध्ये झालेला राष्ट्रीय उठाव समस्त भारतीय जनतेला प्रेरणा देणारा ठरला..त्यामुळे.देशभक्ती चे स्फुल्लिंग हळूहळू अधिक पसरत चालले.त्यानंतर रामोशांच्या मदतीने वासुदेव बळवंत फडके या क्रांतीवीराने केलेला उठाव .यातून भारतीय स्वातंत्र्य लढा जोमाने लढण्याची प्रेरणा आणखी वाढत गेली.1885 ला राष्ट्रीय सभेची स्थापना झाली. अन सनदशीर मार्गाने इंग्रजाविरुद्ध लढा सुरू झाला. अशातच 1910 मध्ये काँग्रेसचे शौकत आली व महंमद अली यांनी ‘कॉम्रेड ‘नावाचे उर्दू जहाल साप्ताहिक सुरू केले.याच कालावधीत मानवेंद्रनाथ रॉय हे थोर भारतीय क्रांतिकारक दक्षिण अमेरिकेतील मेक्सिको देशातील कम्युनिस्ट आंदोलनात भाग घेत होते. त्या दरम्यान पंजाबमधील काही तरुण रोजगार शोधण्यासाठी पूर्वेकडील फिलिपाईन्स देशातून अमेरिकेचा पश्चिम किनारा असा प्रवास करून गेले व अमेरिकेच्या राजकीय वातावरणाचा परिणाम होऊन इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारताला मुक्त करण्यासाठी त्यातील काही तरुणांनी गदर पक्षाची स्थापना केली. त्यात सरदार कर्तारसिंग व सरदार पृथ्वीसिंग प्रमुख होते. हे सारे तरुण कम्युनिष्ट विचाराचे होते. अन कम्युनिस्ट विचाराचे वारे भारतात वाहू लागले.अन 26 डिसेंबर 1925 ला भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना कानपुर येथे झाली.आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा 95 वा स्थापना दिन.

पक्ष स्थापनेवेळी त्यात सिंगरवेलू अध्यक्ष ,सचिव  घाटे तर कॉम्रेड जोगळेकर ,आर एस .निंबकर ,मुझफ्फर अहमद,काँ.डांगे आदीजण समिती सदस्य होते. दरम्यान इंग्रज सरकारने कम्युनिस्ट विचारांच्या क्रांतिकारकावर वेगवेगळे कट रचले. त्यात लाहोर कट ,पेशावर कट, कानपूर कट यातून काहींना पकडले गेले तर काहींना प्रदीर्घ काळासाठी सश्रम कारावासात पाठवले.भारतीय स्वातंत्र्यलढ्यात कम्युनिस्टांनी अजोड कामगिरी केली आहे. त्यात संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव सर्वप्रथम कम्युनिस्टांनी मांडला होता.हिंदू-मुस्लिम ऐक्याचा जाहीरनामा कम्युनिस्टांनी प्रसिद्ध केला होता. मार्क्सवाद लेनीनवादाचा प्रसार करण्यात  पुढाकार कम्युनिस्टानीच घेतला होता.1928 मध्ये सायमन कमिशन विरोधी लढ्यात कम्युनिस्टांचा प्रचंड सहभाग होता. मुंबई गिरणी कामगारांचा संप घडवून आणण्यात कम्युनिस्टांचा मोठा पुढाकार होता. सेंट्रल असेंब्लीत बॉम्ब टाकणारे शहीद भगतसिंग, बटुकेश्वर दत्त ही मंडळी कम्युनिस्ट विचारसरणीची होती. अगदी सर्व लढ्यात कम्युनिस्ट अग्रेसर होते. त्याकाळी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांच्या नेतृत्वाखाली आशियातील सर्वात मोठी गिरणी कामगार युनियन मुंबईला कार्यरत होती. 1920 मध्ये स्थापन झालेली आयटक म्हणजेच ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस ही कामगार संघटना कम्युनिस्ट विचारांच्या कार्यकर्त्यांनी सुरू केली होती.पुढे 1936 मध्ये अखिल भारतीय किसान सभा ,ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ,पुढे पुरोगामी लेखक संघ, लोकनाट्य संघ,आँल इंडिया युथ फेडरेशन अशा सगळ्या संघटनांचे काम सुरु झाले व त्यांचे नेतृत्व कम्युनिस्ट पुढारी करत होते .

1942 मध्ये चले जाव आंदोलनात पक्षातील बरीच मंडळी होती.त्यात कॉम्रेड क्रांतिसिंह नाना पाटील,काँ.शेख काका ,काँ.जी.डी.बापू लाड अशा अनेक क्रांतिवीरांचा समावेश होता. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे पहिले सरचिटणीस कॉम्रेड सच्चिदानंद विष्णू घाटे यांना तर मिरत कटात बारा वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा झाली होती. भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे आणखी एक सरचिटणीस कॉम्रेड अजय घोष हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन आर्मी चे सदस्य होते.चंद्रशेखर आजाद ,भगतसिंग यांचे ते सहकारी होते.अशा रीतीने भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील पक्षाच्या सहभागाचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे .भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे 24 वर्षे सरचिटणीस असणारे कॉम्रेड सी. राजेश्वर राव तेलंगणा आंदोलनात एक सर्वश्रेष्ठ योद्धे होते.त्यांनी सहा वर्षे भूमिगत तर  14 वर्षे तुरुंगात काढली होती. त्यांनी ब्रिटिश राजवटीत कारावास भोगला शिवाय काँग्रेसच्या राज्यात अनेक वर्षे तुरुंगात काढली.असा भारतीय कम्युनिस्टपक्षाचा गौरवशाली इतिहास आणि एक गौरवशाली परंपरा होती अन आजही आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या लोकसभेत कम्युनिस्ट पक्षाचे 36 खासदार निवडून आले होते.काँ.रविनारायण रेड्डी हे भारतात सर्वात जास्त मते मिळवून निवडून आले होते.पहिल्या संसदेतील विरोधी पक्ष भा.क.प होता.खासदार काँ.ए.के.गोपालन हे भारताचे पहिले विरोधी पक्ष नेते होते.पुन्हा 1957 साली पक्षाचे नेते काँ.श्रीपाद डांगे मध्य मुंबंई मतदार संघातून देशात सर्वाधिक मते मिळवून निवडून आले व देशाचे विरोधी पक्षनेते बनले.त्याला कारण कष्टकरी श्रमिकांचा लढा उभारून देशभक्ती आणि कम्युनिझम या दोन प्रेरणा पक्षाने कायम उच्च पातळीवर राखलेल्या आहेत.दुर्दैवाने 1964 ला पक्षात फूट पडली व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची निर्मिती झाली.1969 मध्ये केरळला जगातील पहिले लोकशाही पद्धतीने निवडून येणारे सरकार म्हणजे कम्युनिस्टाचे सरकार ठरले.'”स्वराज्य हे कामगारांचं शेतकऱ्यांचं बुद्धिजीवीचं बनवा”‘ही वैचारिक स्पष्टता फक्त कम्युनिस्टांच्या मध्ये आहे.भांडवलशाहीमध्ये मानव जातीला कसलेच भवितव्य राहणार नाही याचं प्रत्यंतर दिवसागणिक अधिकाधिक ठळक होत आहे. भांडवलशाहीच्या धोरणामुळे मानव जाती पुढे निर्माण होणाऱ्या समस्या सुटू शकत नाहीत व दडपशाही पासून मुक्त असा माणुसकी व सामाजिक न्यायावर आधारित अधिक प्रगत समाज अस्तित्वात आणायचा याची हमी फक्त समाजवादच देऊ शकतो यावर कम्युनिस्टांचा विश्वास आहे.आणि म्हणून एकविसाव्या शतकात हाच प्रकाश स्तंभ आपला भावी मार्ग उजळत राहणार आहे म्हणूनच ” एकविसावे शतक समाजवादाचे”यावर कम्युनिस्टांचा विश्‍वास आहे. भारतीय स्वातंत्र्यलढा, गोमंतकाचा मुक्तिसंग्राम, तेलंगणातील शेतकऱ्यांचा मुक्ती संग्राम, संयुक्त महाराष्ट्राचा लढा,या सर्व आंदोलना मधील हजारो कम्युनिष्ट हुतात्म्यांना, दिवंगत नेत्यांना ,कार्यकर्त्यांना पक्ष स्थापना दिनी आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचा क्रांतिकारी लाल सलाम.कम्युनिस्ट पक्षाच्या पुढाकाराने या देशातील अनेक महत्त्वाचे प्रश्न सुटलेले आहेत हे कधीही विसरुन चालणार नाही.कम्युनिस्ट पक्षाच्या खासदारांचा एक वेगळा असा नैतिक दबाव देशाच्या संसदेत प्रथमपासूनच राहिलेला आहे. 

कम्युनिस्ट पक्षाचा खासदार म्हणजे साधी राहणी ,उच्च विचारसरणी घेऊन वावरणारा,संसदेतील सर्वात कमी उत्पन्न असणारा,गुन्हेगारीचा,भ्रष्टाचाराचा आरोप नसणारा,काँ.इंद्रजित गुप्तासारखा सलग दहावेळा खासदार म्हणून निवडून येऊन उत्क्रष्ट संसदपटचा  पुरस्कार मिळवणारा,अशी प्रतिमा आजपर्यत पक्षाने जपलेली दिसून येते. तसेच रस्त्यावरची लढाई करण्यात पक्षाच्या हजारो कार्यकर्त्यांनी आपली जिंदगी व्यतीत केलेली आहे आणि त्यामुळे या देशाच्या इतिहासातील श्रमिकांचे, शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे कामगारांचे अनेक प्रश्न गल्लीपासून संसदेच्या दरवाज्यापर्यंत आंदोलनाद्वारे ठोठावण्यात नेहमीच पुढाकार कम्युनिस्टाचा राहिलेला आहे. कम्युनिस्टांचा संसदीय लोकशाही वर विश्वास असून प्रबोधनातून परिवर्तन करणे आणि निवडणुकांच्या माध्यमातून आम जनते मध्ये अधिकाधिक विश्वास संपादन करणे या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत असे कम्युनिस्ट मानतात. संयुक्त पुरोगामी आघाडीचे केंद्र सरकार असताना कम्युनिस्टांच्या मुळे अनेक विधायक कामे राष्ट्रीय पातळीवर पूर्ण झालेली आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी विधेयक आणून तसा कायदा पास करून घेण्यात कम्युनिस्टांनी पुढाकार घेतला होता.राष्ट्रीय वन हक्क कायदा पास करून घेण्यात कम्युनिस्टांचा पुढाकार होता. 

राष्ट्रीय पातळीवर भटक्या निमभटक्या राष्ट्रीय आयोगाची स्थापना करून घेण्यात कम्युनिस्टांचा पुढाकार होता. त्यामुळे रेणके आयोग स्थापन होऊन या आयोगाने 83 शिफारशींचा अहवाल केंद्र सरकारला सादर केला होता. तत्कालीन राष्ट्रीय कृषी आयोगाचे सदस्य आणि भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नेते कॉम्रेड अतुल कुमार अंजान यांच्या सूचनेवरून देशातील सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा निर्णय आयोगाने घेऊन तशी सूचना केंद्र सरकारला केली होती.काँ.बर्धन सारख्या काँम्रेडनेच संयुक्त पुरोगामी आघाडी च्या बैठकीत एका महीलेलाच देशाचे राष्ट्रपतीपदासाठी उभे करावे अशी सूचना मांडली होती.म्हणूनच प्रतिभाताई पाटील देशाच्या पहिल्या महीला राष्ट्रपती होऊन भारताची मान जगात उंचावली.देशाला घातक अशा अमेरिका-भारत अणुकराराच्या वेळी देशाचं हित लक्षात घेऊनच केंद्र सरकारचा पाठिंबा पक्षाने काढला होता.त्याही पुर्वी देवेगौडा पंतप्रधान असताना कम्युनिस्ट पक्षाचे दोन नेते केंद्रीय मंत्रीमंडळात कँबिनेट मंत्री होते.केंद्रीय गृहमंत्री काँ.इंद्रजित गुप्ता,केंद्रीय कृषिमंत्री काँ.चतुरानन मिश्रा.त्यावेळी पक्षाने देशात प्रथमच पक्षाच्या एका लढवय्या नेत्यास केंद्रसरकारकडून साखर कारखाना मंजूर करुन घेतला.तो नेता होता भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील सातारा प्रतिसरकारचे सरसेनापती काँ.जी.डी.बापू लाड.आजही हा कारखाना उत्तम रितीने चालू असून कारखान्याचे चेअरमन अरुण लाड पुणे पदवीधर मतदारसंघातून नुकतेच आमदार झाले आहेत.(महाविकास आघाडीचे)..

 लोकसभेतील राज्यसभेतील कम्युनिस्ट पक्षाच्या  खासदारांचे काम नेहमीच वाखाणण्याजोगे राहिले आहे.क्रांतीसिंह काँ.नाना पाटील भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकीटावर दोनवेळा खासदार झाले होते.संसदेच्या इतिहासात शेतकऱ्यांचं दुखणं मराठीतून मांडणारा पहिला खासदार म्हणून क्रांतीसिंह काँ.नाना पाटील यांची नोंद घेतली गेलीय. कम्युनिस्ट पक्षाच्या अभ्यासू खासदारांनी अनेक घातक धोरणे लीलया हाणून पाडली आहेत. देशाची राष्ट्रीय एकात्मता धोक्यात येऊ नये आणि जातीयवादी धर्मांध फुटीरतावादी शक्तींनी तोंड वर काढू नये म्हणून कम्युनिस्टांनी नेहमीच रस्त्यावरची लढाई करण्यात सुद्धा पुढाकार घेतला आहे.देशातील सर्व कर्मचाऱ्यांच्या प्राँव्हीडंड फंडावरील व्याजदर कमी करु नयेत म्हणून कम्युनिस्ट पक्षाचे खासदारांनी नेहमीच संसदेत आक्रमक भुमिका घेत राहिलेने फंडावरील व्याजदर साडेआठ टक्य्याच्या खाली कधीच येऊ शकले नाही हे लक्षात घ्यायला हवे. अशारितीने अत्यंत गौरवशाली अशा कार्यामुळे भारताच्या उभारणीतील एक महत्त्वाचा साक्षीदार ठरलेला चारित्र्यवान पक्ष म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्ष…

 आज गल्लीपासून दिल्लीपर्यंत भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि पक्ष अंगीकृत जनसंघटना यामध्ये सक्रिय असणाऱ्या हजारो काँम्रेडसना् पक्षाच्या स्थापना दिनी क्रांतीकारी लाल सलाम.

   ले.  मारुती शिरतोडे-राज्य निमंत्रक, आद्यक्रांतीवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र -9096239878

Leave a Reply