sampadakiyayuva sanvaad

अस्वस्थ करणाऱ्या वर्षाच्या समाप्तीकडे जाताना……

 

सकाळी फेरफटका मारताना एक विशीतला तरुण खूप चिंतेत बसलेला दिसला. दोनदा फिरून आल्यावरही तो तिथेच आणि त्याच चिंताक्रांत अवस्थेत दिसून आला. तेव्हा त्याच्याशी बोलावे या हेतूने मी त्याच्याकडे वळलो आणि त्याच्या शेजारी जाऊन बसलो. तो खूप वेळ शांतच होता. मीच सुरुवात केली. विचारपूस केली. तेव्हा अपेक्षेप्रमाणे कोरोनामुळेच चिंतीत होता. त्याच्याशी खूप बोललो. खूप मनमोकळ्यापणे गप्पा मारल्या. थोडीशी चिंता मिटल्यासारखी वाटली त्याची. पण त्याने विचारलेल्या एका प्रश्नाचे मात्र मला खूप अप्रूप वाटले, तो म्हणाला, “भाई, हे जग खरंच पुन्हा सुरू होईल का?” मी अक्षरशः गोंधळलोच आणि हादरलोसुद्धा त्याच्या या प्रश्नावर. तो तरुण किती खोलवर विचार करत होता! यावरून आजची संवेदनशील तरुणाई कसा विचार करतेय याचा पुसटसा पण अत्यंत महत्वाचा प्रवाह समोर आला.

                   २०२० हा दशकातीलच नव्हे तर शतकातील कायम स्मरणात राहणारा वर्ष असणार यात कुणाचेही दुमत असण्याचे कारण नाही. या वर्षात सगळ्या जगाने असंख्य घडामोडी अनुभवल्या. त्यात सर्वात प्रभावी आणि कायम स्मरणात राहील तो म्हणजे कोरोनाकाळ! कोरोनामुळे संपूर्ण विश्वाचे जनमानस ढवळून निघाले. कधी न थांबणारे जग स्तब्ध झाले. अमेरिका सारखी बलाढ्य महासत्ता, युरोप सारखा प्रगतशील भूप्रदेश या कोरोनाच्या वादळापुढे टिकाव धरू शकला नाही. भारतातही काही कमी हानी झाली नाही. जवळपास आठ दशलक्ष कोरोनाबाधित रुग्ण आपल्या देशात आढळून आले. रुग्णसंख्येचा वेग मंदावला जरी असला, तरी रोजची भर पडतेच आहे.

    कोरोनाने त्याच्या प्रवासात जसे अनामिक भय संपूर्ण जगात पसरवली, तसे त्याने अनुभवही दिले. सुरवातीला फक्त चीन पुरता मर्यादित असणाऱ्या कोरोना या विषाणूने फक्त काही महिन्यांतच संपूर्ण जगाला विळखा घातला. पर्यायी संपूर्ण जग स्तब्ध झालं, दळणवळण, व्यापार, पर्यटन आदी कारणांमुळे अहोरात्र चालणारं मानवी चक्र थांबवण्यात आलं. एरवी क्षणाच्या विलंबाने गोंधळणारा, व त्याविषयी आक्रोश करणारा मानवसमूह गेले आठ महिने कोरोनाच्या भीतीने निपचित पडलाय. त्याच्या पूर्वपदावर येण्याची चिन्हे तूर्तास दिसत नसली तरी ही परिस्थिती कायम असणार नाही, हे निश्चित आहे.

         आपल्याही देशात कोरोनाने चांगलाच कहर केला. पण त्याहीपेक्षा जास्त कहर त्यातून उद्भवलेल्या परिस्थितीने, बिनबुडाच्या अफवांनी आणि कपटी राजकारण्यांच्या विद्वेषी खेळीनी केला. कोरोनाची परिस्थिती जसजशी वाढत होती, तसतशी लोकांमधील भीती वाढत होती. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दळणवळण बंद पडले. सर्व व्यवसाय, कारखानदारी बंद पडली. देशाची सर्व आर्थिक बाजू ठप्प पडली, आणि तीही थोडीथोडकी नव्हे तर तब्बल सहा ते सात महिने. त्यामुळे हातमजुर, रोजंदारी मजूर, तसेच सर्वसामान्य जनतेवर हलाखीची परिस्थिती निर्माण झाली. अजूनही बरीचशी किंबहुना सर्वच जनता या आर्थिक दृष्टचक्राशी लढतेय.

     याचा सर्वात जास्त परिणाम झाला तो युवा वर्गावर. नुकतीच जबाबदारी अंगावर आलेले युवक, पदवीधर होऊन बाहेर पडलेले युवक यांना ऐन उभं राहण्याच्या काळात शांत बसावं लागलं. आहे त्या नोकऱ्या गेल्या तेव्हा नवीन नोकऱ्या उपलब्ध होणे तसे दुर्मिळच. ज्यांनी पुढच्या नियोजनाच्या आधारे बँकेतून किंवा इतर तत्सम वित्तीय संस्थांकडून ऋण घेतले होते ते हवालदिल झाले. अनेकांनी आपल्या करियरला गांभीर्याने घेऊन अनेक स्वप्ने रंगवली होती ती धुळीस मिळाली. याबाबतीत एक मोठा विचार करायला लावणारा प्रसंग मला अनुभवयास मिळाला. सकाळी फेरफटका मारताना एक विशीतला तरुण खूप चिंतेत बसलेला दिसला. दोनदा फिरून आल्यावरही तो तिथेच आणि त्याच चिंताक्रांत अवस्थेत दिसून आला. तेव्हा त्याच्याशी बोलावे या हेतूने मी त्याच्याकडे वळलो आणि त्याच्या शेजारी जाऊन बसलो. तो खूप वेळ शांतच होता. मीच सुरुवात केली. विचारपूस केली. तेव्हा अपेक्षेप्रमाणे कोरोनामुळेच चिंतीत होता. त्याच्याशी खूप बोललो. खूप मनमोकळ्यापणे गप्पा मारल्या. थोडीशी चिंता मिटल्यासारखी वाटली त्याची. पण त्याने विचारलेल्या एका प्रश्नाचे मात्र मला खूप अप्रूप वाटले, तो म्हणाला, “भाई, हे जग खरंच पुन्हा सुरू होईल का?” मी अक्षरशः गोंधळलोच आणि हादरलोसुद्धा त्याच्या या प्रश्नावर. तो तरुण किती खोलवर विचार करत होता! यावरून आजची संवेदनशील तरुणाई कसा विचार करतेय याचा पुसटसा पण अत्यंत महत्वाचा प्रवाह समोर आला.

       कोरोनाच्या पुराप्रमाणे देशभरात कोरोनाला आव्हान देत मदतीचा पुरही ओसंडून वाहत राहिला. अनेक लोकांनी आपली जबाबदारी ओळखत अनेक गरजवंतांना मदत केली. अगदी भाजीपल्यापासून ते किराणा, कपडे आदी वस्तूंचे देशभरात वाटप झाले. पण दोन महिने चाललेल्या या मदतकार्यानंतर मात्र लोकांपुढे खरे आव्हान उभे राहिले. जे आज लोकांसमोर एका आपत्तीप्रमाणे उभे आहे. ते म्हणजे ही विस्कटलेली आर्थिक घडी बसवायची काशी? जे बेरोजगार आहेत त्यांचे तर हाल विचारू नका, पण चालू नोकऱ्या लोकांना गमवाव्या लागल्या. छोटे छोटे व्यावसायिक रसातळाला गेले. नैराश्यातून आणि आर्थिक विवंचनेतून  अनेकांनी आपली जीवनयात्रा संपवली. होतं नव्हतं भांडवल आठ महिने कुटुंबाच्या उदरनिर्वाहात गेलं. आता पुन्हा त्याच ताकदीने उभे राहण्याचे तगडे आव्हान या सर्वांसमोर आहे. मला वाटतं हाच सगळ्यात मूलभूत आणि महत्वाचा प्रश्न सामान्य ते मध्यमवर्गीय यांचा असणार आहे.

       आरोग्याच्या दृष्टीने लोकं सजग झालेले प्रथमदर्शनी जरी दिसत असले तरी त्यात कितपत तथ्य आहे हे महानगरांच्या दैनंदिन बाजारपेठा किंवा खरेदी केंद्रे यांना बघून कळेल. बाजारपेठेतली झुंबड बघून तर असे वाटते की या लोकांना कोरोना नावाचं संकट जगभर भयंकर धुमाकूळ घालतोय हे ध्यानी मनी नसेलच. नाहीतर त्यांनी अशी गर्दी केलीच नसती. पण जेव्हा आर्थिक बाजू पूर्णपणे कोसळली असेल, समोर कोणताच पर्याय शिल्लक नसेल तेव्हा हे ओघाने येणारच हे गृहीत धरून चालावे लागेल. 

       आरोग्याच्या दृष्टीने विद्यार्थ्यांचे कसे होईल ही देखील एक महत्वपूर्ण तसेच चिंतेची बाब आहे. मुलांना शाळेत पाठवावे की पाठवू नये हा मोठा प्रश्न पालकांसमोर आज उभा ठाकला आहे. एक माणूस तर मला म्हणाला की, “मुलगा नापास झाला तरी चालेल, एक वर्ष वाया गेले तरी चालेल, पण मी या वर्षी मुलाला शाळेत पाठवणार नाही.” अशीही भूमिका पालक घेऊ लागले असल्याचे बघायला मिळत आहे.

      एकूणच कोरोनाने जनमानस अंतर्बाह्य हादरवून सोडले आहे. कोरोनाने शांत बसणाऱ्यांना विचार करायला, विचार करणाऱ्यांना धावायला व धावणाऱ्यांना शांत बसणाऱ्यांकडे बघायला शिकवलं. निसर्गाकडून आलेल्या या अद्भुत व्हायरसने हे एक आगळंवेगळं मानवी चक्र सुरू करून दिलं. मानवाचे हे खास वैशिष्ट्य आहे. तो लगेच परिस्थितीशी समायोजन करून घेतो. याही वेळी परिस्थितीशी जुळवून घेण्याची त्याची धडपड वखण्याजोगीच आहे. मानवावर अनेक संकटे आली, त्याने ती लीलया पेलली देखील! या ही संकटाला तो मोठ्या धीराने आणि संयमाने उत्तर देतोय. पण त्या विशीतल्या तरुणाचा तो प्रश्न पुन्हा पुन्हा प्रत्येकाला एकदा तरी अस्वस्थ करणार हे नक्की!

       – जावेद शाह

    सहसंपादक, ए.बी.एस. न्यूज मराठी

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!