AarogyaBreaking News

अवैध धंद्याच्या विरोधात SFI-DYFI ची 1 लाख सह्यांची मोहीम

 

सोलापूर/शाम आडम : सोलापूर शहर अवैध धंद्यांच्या विळख्यात अडकलेला आहे. याला इथले लोकसेवक, लोकप्रतिनिधी आणि त्यांच्याशी मिलिभगत असणारी प्रशासकीय यंत्रणा कारणीभूत आहे. समाजाला अवैध धंद्यांचे विष पाजणारे लोक स्वतःला समाजसेवक संबोधतात. हीच या लोकशाहीची मोठी शोकांतिका आहे. या अवैध धंद्यांच्या विळख्यातून श्रमिकाला कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी लोकप्रबोधनाची गरज आहे. म्हणून अवैध धंद्यांच्या विरोधात 2 ऑक्‍टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया(SFI) तसेच भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ(DYFI) च्या वतीने एक लाख सह्यांचे निवेदन राज्यपाल, मुख्यमंत्री यांना समक्ष भेटून देणार असल्याची घोषणा माजी आमदार नरसय्या आडम यांनी केली.

दत्तनगर लाल बावटा कार्यालय येथे मंगळवारी (ता. 29) आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत माकपचे ज्येष्ठ कामगार नेते तथा माजी आमदार श्री. आडम (मास्तर) बोलत होते. 

श्री. आडम पुढे म्हणाले, ही लांब पल्ल्याची लढाई असून जनतेला विश्वासात घेऊन आम्ही टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा पवित्रा अधिक आक्रमक करणार आहोत. सोलापूर हे कष्टकरी कामगारांचे शहर आहे. येथे विडी कामगार, यंत्रमाग कामगार, शिलाई कामगार, बांधकाम कामगार, रिक्षाचालक, उपहारगृहात काम करणारे कामगार, फळभाजी विक्रेते, फेरीवाले, चारचाकी वाले विशेष म्हणजे सुशिक्षित तरुण वर्ग असे अनेक विविध संघटित, असंघटित क्षेत्रात काम करणारे कामगार मटका व्यवसायाच्या आहारी गेलेले आहेत. बदलत्या काळानुसार या व्यवसायात आधुनिक बदल करून ऑनलाइन पद्धतीने मटका व्यवसाय एजंटांमार्फत चालू आहे. 

शहरात मोठ्या प्रमाणात संघटित गुन्हेगारी, सराईत गुंड आणि समाजकंटक यात वाढ होत आहे. याचा दूरगामी परिणाम सुसभ्य समाजावर होत असून सामाजिक अभिसरणाच्या प्रक्रियेला बाधा निर्माण होत आहे. त्यात कष्टकरी कामगारांची मटका व्यवसायाच्या माध्यमातून होणारी लयलूट तातडीने थाबली पाहिजे. मटका व्यवसाय आणि मटका चालक याला खतपाणी घालणारे लोकप्रतिनिधी, लोकसेवक आणि प्रशासकीय अधिकारी यांची जी साखळी आहे ती तोडून सोलापूर शहर गुन्हेगारीमुक्त, अवैध धंदेमुक्त करण्यासाठी गांभीर्याने पावले उचलावी. वास्तविक परिस्थिती लक्षात घेऊन पोलिस प्रशासनामार्फत नि:पक्षपाती चौकशी आणि दोषींवर कडक कारवाई करावी; अन्यथा सबंध मटका, जुगार, अवैध धंदे यापासून पीडित असलेल्या कुटुंबीय, समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती, विविध सामाजिक संघटना आणि सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांना घेऊन महाराष्ट्र राज्यभर आंदोलन छेडणार आहे. 

पत्रकार परिषदेस ऍड. एम. एच. शेख, युसूफ शेख, विक्रम कलबुर्गी,मल्लेशम कारमपुरी आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: Content is protected !!