अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं आढळल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांची पत्रकार परिषद


मुंबई -उद्योगपती अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं आढळल्याप्रकरणी मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे ह्यांनी अत्यंत रोखठोक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याच पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

• गृहमंत्र्याने एखाद्या पोलीस आयुक्ताला दर महिन्याला १०० कोटी रुपये मागितले असा आरोप पोलीस आयुक्तांनी केल्याची घटना ही राज्याच्याच काय तर देशाच्या इतिहासातील पहिली घटना असेल. ही घटना लज्जास्पद आहे.

• जर गृहमंत्री अनिल देशमुख मुंबई पोलिस आयुक्तांना १०० कोटी रुपये मागत असतील तर राज्यातील इतर शहरातील किती आयुक्तांकडे किती मागितले ह्याचा तपशील पण कळला पाहिजे.

• वाझे प्रकरणात मुळात परमबीर सिंग ह्यांना त्यांच्या पदावरून का हटवलं, जर ते दोषी होते तर मग त्यांना निलंबित का नाही केलं? त्यांची चौकशी का नाही केली गेली? त्यांची बदली का केली गेली?

• मुकेश अंबानींच्या घराबाहेर बॉम्बची गाडी ठेवली गेली हा मूळ विषय आहे तो विषय मागे पडला आहे. त्या गाडीत सापडलेलं जिलेटीन कुठून आलं? ह्याची उत्तरं अजून का नाही मिळाली?

• सचिन वाझे ख्वाजा युनूस प्रकरणात निलंबित होते, त्यानंतर काही कालावधीत वाझेंनी शिवसेनेत प्रवेश केला मग भाजप-शिवसेना सरकार असताना फडणवीस म्हणतात त्या प्रमाणे सचिन वाझे ह्यांना सेवेत परत घ्या म्हणून उद्धव ठाकरे शिफारस करतात. मग ज्या उद्धव ठाकरे आणि मुकेश अंबानी ह्यांची घनिष्ट मैत्री आहे त्याच अंबानींच्या घराबाहेर स्फोटकं सापडतात आणि त्यात वाझेंना अटक होते मग वाझेंचा शिवसेनेत प्रवेश कुणामार्फत झाला? का झाला?

• अंबानींच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि ती गाडी पोलिसांनी ठेवली असा आरोप आहे, मुळात अशी घटना कुण्या वरिष्ठांच्या सांगण्याशिवाय होऊ शकते का? त्यामुळे ही गाडी कोणाच्या सांगण्यावरून ठेवली गेली ह्याचा तपास करण्यासाठी केंद्राने हस्तक्षेप करावा.

• ह्या प्रकरणाची केंद्राने सखोल चौकशी करायला हवी कारण जशी चौकशी पुढे जाईल तशी फटक्यांची माळ लागेल आणि अनेक धक्कादायक नावं बाहेर येतील.

• जगातील सर्वोत्तम पोलीस दल म्हणून मुंबई पोलीस दल ओळखलं जातं, त्या पोलीस दलाचा बॉम्बची गाडी एका उद्योगपतीच्या घराबाहेर ठेवायला सांगण्यासाठी वापर होतो हे भयंकर आहे. ह्याची जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेऊन राजीनामा द्यायलाच हवा. आणि त्यांची चौकशी व्हायलाच हवी.

• माझी माध्यमांना विनंती आहे की त्यांनी हा विषय गंभीर आहे ह्याची जाणीव ठेवून तो विषय भरकटू देऊ नये, आणि हा प्रकार कोणाच्या सांगण्यावरून केला ह्याच्या मागे लागावं.

• माझी केंद्र सरकारला विनंती आहे की त्यांनी ह्या प्रकरणाची सखोल चौकशी करायला हवी कारण ह्या प्रकरणाचा राज्यात निष्पक्ष तपास होईल ह्याची मला अजिबात खात्री नाही. जर केंद्राने पण नीट चौकशी नाही केली तर मात्र जनतेचा सरकारवरचा विश्वास कायमचा उडेल आणि आपण अराजकाच्या दिशेने जाऊ.

• सरकार बरखास्त करा, राष्ट्रपती राजवट लागू करा हे राजकीय मुद्दे आहेत.ह्यात आत्ता नको पडूया. ह्याची चौकशी व्यवस्थित होऊद्या. कारण चौकशी व्यवस्थित झाली नाही तर उद्या प्रत्येकाच्या घराबाहेर अशा गाड्या उभ्या राहतील.पोलिसांना हे कृत्य आणि इतका अतिरेकी विचार करायला लावणारे कोण हे आधी कळू द्या! ,अशी मागणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेद्वारे केली आहे.

Leave a Reply